चोपडा महाविद्यालयात 'एकदिवसीय विद्यापीठस्तरीय नियतकालिक अंक संपादकांच्या कार्यशाळेचे' आयोजन
February 02, 2023
चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.०४ फेब्रुवारी २०२३ रोजी 'एक दिवसीय विद्यापीठस्तरीय नियतकालिक अंक संपादकांची कार्यशाळा' आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील आणि संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत नियतकालिक अंक संपादन उत्तमरितीने करता यावे या दृष्टिकोनातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ.आशुतोष पाटील, धरणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.के एम पाटील, धनदाई महाविद्यालय अमळनेर येथील प्रा.डॉ.लीलाधर पाटील तसेच मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे आदि मान्यवर नियतकालिक संपादन संदर्भातील विविध घटकांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातून विविध महाविद्यालयांचे १०० अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी महाविद्यालयाचे नियतकालिक उत्तमरित्या संपादित करता यावे या दृष्टिकोनातून आयोजित या 'एकदिवसीय विद्यापीठस्तरीय नियतकालिक अंक संपादकांच्या कार्यशाळेत' महाविद्यालयीन नियतकालिक अंक संपादक मंडळातील संपादक तसेच सदस्य यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सुनील कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शैलेशकुमार वाघ यांनी केले आहे.